कारंजात ६५ हजाराचा । अवैध गुटखा जप्त

कारंजा : शहरातील गुरुश्री प्रोव्हीजन्स या दुकानात वाशिम पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान धाड टाकून ६४ हजार ५८० रुपयांच्या प्रतिबंधात्म गुटखा जप्त केला. वाशिम अप्पर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आर.आर. गाठे यांच्या पथकाने प्राप्त माहितीच्या आधारे कारंजा शहरातील स्टेट बँक मार्गावर असलेल्या गुरुश्री प्रोव्हीजनच्या दुकानात गुटखा विक्री होत असताना धाड टाकून विक्री करताना रंगेहात पकडले. यावेळी दुकानाची तपासणी केली असता, रोहीत कृपलानी यांच्या दुकानात ६४ हजार ५८० रुपये किमतीचे विमल, वाह, गोवा, पान बहार नामक प्रतिबंधित गुटखा आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी रोहीत जसपालदास कृपलानी (२०) रा.सिंधी कॅम्प कारंजा याचेविरुध्द अवैध गुटखा प्रतिबंधक अधिनियम अन्वये कारवाई करुन संबंधित अवैध गुटख्याच्या मालासह पुढील कारवाईकरिता अन्न व औषधी प्रशासन कार्यालय अकोला यांचेकडे वर्ग केले. सदरची कारकाई अप्पर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक गाठे, शैलेश महाजन, तुषार भोयर यांचेसह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. पकडलेला गुटखा पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग अकोला यांच्या ताब्यात देण्यात आला.